राजा आणिक राणी
शालेय जीवनातल्या मित्रांपैकी एक जिवलग मित्र....राजेश मोर्ये. शाळेत असताना मस्तीखोर...मागच्या बाकावर बसणाऱ्या मुलांचा अनभिषिक्त म्होरक्या...वर्गातील मित्र मैत्रिणींचे त्यांच्या नकळत वर्गाबाहेरच्या विद्यार्थ्यांच्या टिंगलटवाळीपासून रक्षण करणारा, शिक्षकांची खेचणारा....या सगळ्यांमधून आपली प्रगती करणारा. खरं तर शालेय जीवनापेक्षा त्यानंतर व्यावहारिक पातळीवर आपले अस्तित्व अधोरेखित करून यशस्वी ठरणारा असा सर्वांचा लाडका आमचा राजेश.
मध्यंतरीच्या काळात आपापल्या कामधंद्यात व्यस्त असल्यामुळे साईप्रसाद याच्यामुळे एकमेकांच्या खुशालीची देवाणघेवाण व्हायची. अश्यातच कपिलेशच लग्न ठरल्याचे राजेशने सांगितले. काचेच्या बाटलीत खूप सारी चॉकलेट भरून त्यामध्ये आमंत्रण पत्रिका असे नाविन्यपूर्ण गिफ्ट त्याने आम्हाला दिले. २८ फेब्रुवारीला हळदीला त्याच्या बंगल्यावर म्हणजे मोर्येवाडी, नागावे, कणकवलीला आणि १ मार्चला कोकोनट रिट्रीट कणकवलीला लग्नाचे आमंत्रण दिले. आम्ही लग्नाला येणार हे कळल्यावर आमच्या वर्गातील सौ. तेजाने आम्हाला तिच्या मसुरे येथील वाडीवर दोन दिवस आधी येण्याचे निमंत्रण दिले.
हळदीच्या दिवशी आम्ही सर्व म्हणजे तेजा, श्री बागवे, नीलिमा, वैशाली, साई, सलील, विनायक, धनंजय आणि मी दुपारी राजेशकडे पोहोचलो. राजेशचा टुमदार बंगला चढावावर आहे. पार्किंगसाठी मुबलक जागा आहे. खाली दोन आणि वरती पहिल्या मजल्यावर दोन बेडरूम अशी सुटसुटीत रचना. दिवाणखान्यातील सीलिंग हे तर पहिल्या मजल्यावरील छतापर्यंत. भरपूर सूर्यप्रकाश आणि हवेशीर बांधकाम. राजेश आणि सौ. प्रियाने डोळ्यात तेल घालून बंगल्याची रचना केली आहे.
राजेश अन प्रियाने आमचे दणदणीत स्वागत केले. फुलांची सजावट डोळ्यात भरत होती. राजेश आणि कपिलेश पांढर्या शुभ्र झब्बा लेवून उपस्थितांमध्ये उठून दिसत होते. प्रियाची धावपळ उडाली होती. कपिलेश अरबी पोषाख परिधान करून होणार्या वाग्दत्त वधूला मितालीला भेटून सुखद धक्का देऊन आला. इतक्यात भटजी आले. राजेश निळ्या रंगाचा कुर्ता आणि प्रिया निळ्या रंगाची साडी यामध्ये तयार होऊन आले. कपिलेश ऑरेंज रंगाच्या कुरत्यामध्ये राजबिंडा दिसत होता. जान्हवी सुद्धा देखणी दिसत होती. विधी पार पडले. आता राजेशने आणि प्रियाने पिवळ्या रंगाचे सुंदर कपडे परिधान केले. कपिलेशने पांढर्या कपड्यात न कंटाळता मिशीला पीळ देत फोटो सेशन सुरू केलं. एकदाचा हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. कपिलेशने सगळ्यांकडून हळद लावून घेतली. त्यानंतर नाच सुरु झाले. सर्वात शेवटी जेवण्याची वेळ आली. राजेशने बोकडाचा बेत केला होता. वैशालीसाठी प्रियाने स्वतः खास माश्यांचा बेत आखला होता. यथेच्छ जेवून आम्ही सौ. तेजाकडे निघालो.
दुसर्या दिवशी १ मार्चला सकाळी आम्ही नटूनथटून लग्नासाठी कोकोनट रिट्रीटला पोहोचलो. कपिलेश पिवळ्या रंगाच्या सोवळ्यात डोक्यावर पेशवाई पगडी तर मिताली पिवळ्या रंगाच्या नऊवारी शालूत गोड दिसत होते. राजेशने गडद निळ्या रंगाचा कुर्ता व त्यावर रंगीत जाकिट तर प्रियाने निळ्या रंगाच्या नऊवारी शालूत विवाह सोहोळ्यात चार चाँद लावले. जान्हवी पण सुंदर दिसत होती. दुपारी जेवल्यानंतर आम्ही सौ. तेजाकडे निघालो.
राजेश अन प्रिया या दोघांनी त्यांच्या प्रेमळ अन लाघवी स्वभावामुळे प्रचंड प्रमाणात माणसे गोळा केली आहेत. दोघांनी कधी कुणाला दुखावल नसेल. त्यामुळे त्यांच्या हाकेला ओ देऊन लोकांनी हा विवाह सोहळा संपन्न करण्यात आपला हातभार लावला होता. मी स्वतः शहराबाहेर प्रथमच हळद आणि लग्न सोहोळ्याला उपस्थित होतो. आम्ही सगळ्यांनी मिळून ह्या दोन्ही कार्यक्रमाचा आनंद लुटला.
राजेश आणि सौ. प्रियाला मनापासून धन्यवाद.
सौ. मिताली आणि कपिलेश या दोघांनाही शुभेच्छा आणि वैवाहिक जीवनात सुख समृद्धी लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
व्यक्त व्हावंस वाटलं म्हणून.....
No comments:
Post a Comment