Monday, March 17, 2025



बागवेंचा पाहुणचार
समुद्राच्या लाटा नित्यनेमाने किनार्यावर धडका देत असतात. काही सौम्यपणे तर काही जोरदारपणे. प्रत्येक लाट आवेशाने अन आवेगाने किनार्यावर आदळत असते. किनारा लाटा लाटांचा हा भडीमार आपुलकीने स्वीकारतो. त्याच्या मनात कितीही इच्छा असली तरी तो कुठल्याही लाटेला परस्पर परतवत नाही की परत समुद्राकडे परत जाण्यापासून रोखू शकत नाही. काही लाटा हळुवारपणे किनार्याला थोपटतात जणूकाही मायेने विचारपूस करायला आलेल्या अश्या आविर्भावात अन तश्याच लगबगीने परततात तर काही लाटा जोशात किनार्यावर आपटून नासधूस करून दिसेनाश्या होतात.
आपले उभं आयुष्य काहीस किनार्यासारखं असत. आयुष्यात आलेल्या अनेक लोकांकडून आपण खूप काही शिकतो. चांगल्या माणसांकडून कसं वागायचं आणि वाईट माणसांकडून कसं वागू नये. माझ्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींमध्ये चांगल्या लोकांचे पारडे भारी असावं.
आज माझ्या आयुष्यात आणखीन एक बागवे आले. श्रीयुत अनिल एकनाथ बागवे. माझ्या बालमोहन शाळेतील शालेय मैत्रिणीचे सौ. चंद्रतेजा हिचे यजमान. हाडांचे शिक्षक. ते पण कलेचे. म्हणजे जन्मजात सृजनशील. आमच्या शाळेतील मित्र राजेश याच्या मुलाच्या लग्नाप्रित्यर्थ कणकवलीला जाणे झाले. सौ. चंद्रतेजा हिच्या आग्रहामुळे बागवे उभयतांच्या मसूरे कणकवली येथील वाडीवर आमचा पाच दिवसाचा मुक्काम होता. भेटता क्षणी श्रीयुत बागवे यांनी आमचा ताबा घेतला. असे वाटलेच नाही की आम्ही पहिल्यांदा भेटलो. त्यांच्याशी सहज बोलताना त्यांनी त्यांच्या आयुष्याचा जीवनपट नकळत उलगडून दाखवला. सकारात्मक वृत्ती. माणूस इतका प्रसन्न की आपण आपल्या चिंता विसरून जाऊ. कधी स्वस्थ बसणार नाही. काही ना काही काम सदैव चालू. रक्तात शिक्षक भिनला असल्यामुळे आमच्यातील अजूनही व्रात्य असलेल्यांना शिस्त लावण्यासाठी ते सरसावले. वाडीच्या अवतीभवती देखभालीचे अजस्त्र काम ते लीलया पार पाडीत. त्याचबरोबर नवनवीन विविध रंगांच्या फुलांचे रोप आम्हा सर्वांच्या हस्ते लावले. आयुष्यात जे जे येईल त्याला उभयतांनी धीटपणे सामोरे जाऊन दाखवले. फावल्या वेळात त्यांच्या विद्यार्थ्यांच्या गोष्टी व गमतीजमती ऐकण्यात आम्ही रंगून गेलो. समोरच्याला बोलण्यात गुंतवून ठेवणे हा त्यांचा हातखंडा. बर का त्यांचा आवाजही एकदम भारी. त्यांच्या आवाजातली जुनी गाणी आमच्या कानाला आनंद देऊन गेली. सौ. चंद्रतेजा म्हणाली आधी तर त्यांच बोलण पण गाण्यात होत. दोघांच्या आदरातिथ्य तर काय वर्णावे. आम्हा सर्वांची विशेष बडदास्त ठेवली. खाण्यापिण्याची रेलचेल होती. सौ. चंद्रतेजा जरी शाकाहारी असली तरी मांसाहारी जेवण करण्यात तिचा हात धरू शकत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत भटारखाना चालू आणि मग रात्री आम्ही सर्व शतपावली मारत गप्पा मारल्या. रविवारी बागवे उभयंतांचा निरोप घेतांना आमचा पाय निघत नव्हता.
सौ. चंद्रतेजा आणि श्रीयुत अनिल बागवे या दोघांनाही साष्टांग नमस्कार आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.
व्यक्त व्हावंस वाटलं म्हणून.....
ब्रह्मेश नाडकर्णी
3 मार्च २०२५


No comments:

Post a Comment

आज गुरूवार २७ फेब्रुवारी (kankavli)

  आज गुरूवार २७ फेब्रुवारी   न्याहारीला आंबोळी आणि कोथिंबिरीची चटणी असा फक्कड बेत होता . आंघोळी करून जुआ बेट जाण्यासाठी ...